Friday, May 15, 2015

sorry and thanks

Sorry आणि thanks
“मैत्री” या संकल्पनेविषयी आपल्या काही ठाम समजुती असतात. मित्राच्या एका हाकेसरशी आपले हातातले काम सोडून धावणे, वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मित्राचा जीव वाचवणे, इत्यादी फार मोठ्या अपेक्षा सोडून सुद्धा काही पक्के विचार समाज मनात रुजलेले असतात. त्यातलाच एक म्हणजे “मैत्री मध्ये Sorry आणि Thanks या शब्दांना काहीही जागा नाही.”
एक मित्र दुसऱ्याला Sorry किंवा Thanks म्हणाला, आणि पहिल्या मित्राने त्याला हे वाक्यं ऐकवले, कि किती छान वाटते नाही? यांची मैत्री खरंच किती ग्रेट आहे असं वाटतं. पण समजा दुसऱ्या मित्राने हा सल्ला seriously घेतला तर काय होईल? नक्कीच त्याचा मैत्री वर विपरीत परिणाम होईल.
मुळात दोन व्यक्तींमध्ये मैत्री केव्हा निर्माण होते? जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडतो, तेव्हा ती मैत्री ची फक्त सुरुवात असते. समोरच्या व्यक्तीलाही जेव्हा आपला सहवास आवडतो, आणि मुख्य म्हणजे तिला तो तसा आवडत आहे हे आपल्याला जेव्हा नक्की समजते, तेव्हाच मैत्रीचे नाते खऱ्या अर्थी निर्माण होते.
समाजात औपचारिक पणे बोलताना जेव्हा एक व्यक्ती दुसरीला thanks म्हणते, तेव्हा तिला असे म्हणायचे असते की आपण माझ्यावर उपकार केलेत आणि मी आपला आभारी आहे. उपकाराची भावना मैत्रीत असूच शकत नाही, पण तरीही एक मित्र जेव्हा आपल्याला thanks म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, की तू मला भरभरून आनंद दिलास, माझं आयुष्य अधिक सुखी आणि अनुभवसमृद्ध केलंस, तुझ्या सहवासात चार घटका राहून मी माझ्या चिंता विसरलो. आणि अश्या प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला आवडत आहोत याची त्या एका thanks मुळे खात्री पटून आपणही सुखावतो, आणि मैत्रीचे नाते अधिक गहिरे होते.
आता मैत्री तुटण्याची किंवा दुरावा निर्माण होण्याची प्रमुख कारणे बघितली तर आपल्या असं लक्षात येतं, की गैरसमज हे सर्वात मोठं कारण आहे. एखाद्या मित्राला समजलं की आपण आपल्या मित्राचं मन दुखावलं आहे, पण मैत्रीत Sorry कसलं म्हणायचं, असं म्हणून तो गप्पं राहिला, तर ती जखम कुठेतरी मित्राच्या मनात घर करून राहणारच. त्या क्षणी त्यांची मैत्री टिकेल ही. पण असे अनेक घाव ते एकमेकांना देत गेले, तर आपण हळू हळू एकमेकांपासून दूर कधी गेलो हे त्यांना समजणार सुद्धा नाही. हेच जर आपली चूक लक्षात आल्या बरोबर लगेच मित्राला Sorry म्हटले, तर उलट मित्रालाच वाटेल कि अरे, एवढे Sorry म्हणण्या सारखे काय झाले? जाउदे की!
औपचारिक नात्यात आपण जेव्हा Sorry म्हणतो, तेव्हा ती क्षमा याचना असते, आणि मैत्रीत क्षमा याचनेला स्थान नक्कीच नसते. पण मित्र जेव्हा मित्राला Sorry म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, कि मी तुझं मन दुखावलं आहे, याची मला जाणीव आहे, आणि मलाच त्याचा इतका त्रास होतोय, की जणू काही तुला दुखावून मी माझं स्वतःचं मन दुखावलं आहे.
आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं, हे कोणत्याही नात्यात अतिशय गरजेचं असतं, कारण समोरच्या माणसाला आपलं मन जरी समजत असलं, तरी त्याला जे समजलंय ते बरोबर आहे ही खात्री त्याला केवळ आपणच देऊ शकतो. आणि ही खात्री देण्यासाठी sorry आणि  thanks खूपच उपयोगी पडतात.
मित्राने मित्राला Sorry किंवा Thanks म्हणणे, आणि मग मित्राने त्याला त्याबद्दल लटकेच रागावणे, यात जी गम्मत आहे, ती एकमेकांना कधीही sorry आणि  thanks न म्हणणाऱ्या मित्रांना कधी समजणारच नाही. कारण ते मित्र एकमेकांना गृहीत धरत असतात. आणि मैत्रीच नव्हे, कुठल्याही नात्यातील माणसे एकमेकांना गृहीत धरत असतील, तर त्यांचा एकमेकापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे हे नक्की समजावे.
तेव्हा कितीही जवळचं नातं असेल, तरीही sorry आणि  thanks ची साखरपेरणी अधून मधून करायला काहीच हरकत नाही. फक्त त्याचा औपचारिक अर्थ न घेता मैत्रीतला वेगळा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे झाले! मग आपण आपल्या मित्राला गृहीत धरणार नसलो, तरी त्याच्या प्रेमाला नक्कीच गृहीत धरून चालू शकतो!


The law of violence?

The law of violence?


एकूण लोकसंख्येच्या अति अति नगण्य प्रमाणात अशी काही माणसे असतात, की जी पूर्णपणे थंड डोक्याने,ठरवून मनुष्यहत्या करू शकतात.एकतर पूर्णपणे उलट्या काळजाची, विकृत गुन्हेगार माणसे हे करू शकतात, किंवा मग, यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली, आणि आपण जे करीत आहोत ते देशाच्या, समाजाच्या हिताचे आहे याची संपूर्ण खात्री असलेली....पोलीस किंवा सैनिक अशांसारखी माणसे. फ़ार फ़ार कमी लोक असे असतात, की जे, दंगलीसारख्या एखाद्या अत्यंत प्रक्षुब्ध, ज्वालाग्राही भावनेने भारलेल्या कालखंडात मनुष्यहत्त्येचं पातक करू शकतात....पण अशा लोकांना त्या कृत्याची टोचणी अगदी अखेरपर्यंत सोबत करते.
बोकड, कोंबडी इत्यादी प्राण्यांना मांसासाठी मारायचे असेल, तर केवळ मांसाहारी आहे म्हणून वाट्टेल तो माणूस हे काम करू शकणार नाही. त्यासाठी व्यावसायिक खाटिक असणे गरजेचे आहे. मोठ्या वन्य प्राण्याची शिकार करायची असेल तर अगदी व्यावसायिक खाटिक नाही, पण तरीही बरंच धाडस अंगी असावं लागतं, आणी दगडी काळीज सुद्धा. पण त्या मानाने पक्ष्यांची शिकार करणारे संख्येने जास्त आहेत. पाण्यातील मासे पकडणे हा कोळी लोकांचा व्यवसायही आहे, आणि कित्येक लोकांचा छन्दही.
घरातील उंदीर मारणे, हेसुद्धा अगदी प्रत्येकाला जमणारे काम नव्हे, त्यासाठी थोडातरी धीटपणा हवाच. पाल मारणे हे त्या मानाने सोपे, पण तरीही बहुतेकांना नकोसेच वाटणारे काम.
अती हळव्या (आणि त्यामुळे चेष्टेचा विषय बनलेल्या) माणसांचं एक सोडलं, तर बाकी बहुतेक सर्वजण, डास,मुंग्या,झुरळे इत्यादीना अगदी सहज चिरडू शकतात.
आणि मातीत उगवलेलं एखादं गवताचं पातं, एखादे शेंबडे पोर देखील सहज उपटून फेकून देते.
एखादा जीव स्वतःपेक्षा जेवढा वेगळा, तेवढा तो हिंसक रीतीने नष्ट करणं माणसाला सोपं जातं, असा काही निसर्गनियम आहे काय???