Friday, May 15, 2015

sorry and thanks

Sorry आणि thanks
“मैत्री” या संकल्पनेविषयी आपल्या काही ठाम समजुती असतात. मित्राच्या एका हाकेसरशी आपले हातातले काम सोडून धावणे, वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून मित्राचा जीव वाचवणे, इत्यादी फार मोठ्या अपेक्षा सोडून सुद्धा काही पक्के विचार समाज मनात रुजलेले असतात. त्यातलाच एक म्हणजे “मैत्री मध्ये Sorry आणि Thanks या शब्दांना काहीही जागा नाही.”
एक मित्र दुसऱ्याला Sorry किंवा Thanks म्हणाला, आणि पहिल्या मित्राने त्याला हे वाक्यं ऐकवले, कि किती छान वाटते नाही? यांची मैत्री खरंच किती ग्रेट आहे असं वाटतं. पण समजा दुसऱ्या मित्राने हा सल्ला seriously घेतला तर काय होईल? नक्कीच त्याचा मैत्री वर विपरीत परिणाम होईल.
मुळात दोन व्यक्तींमध्ये मैत्री केव्हा निर्माण होते? जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडतो, तेव्हा ती मैत्री ची फक्त सुरुवात असते. समोरच्या व्यक्तीलाही जेव्हा आपला सहवास आवडतो, आणि मुख्य म्हणजे तिला तो तसा आवडत आहे हे आपल्याला जेव्हा नक्की समजते, तेव्हाच मैत्रीचे नाते खऱ्या अर्थी निर्माण होते.
समाजात औपचारिक पणे बोलताना जेव्हा एक व्यक्ती दुसरीला thanks म्हणते, तेव्हा तिला असे म्हणायचे असते की आपण माझ्यावर उपकार केलेत आणि मी आपला आभारी आहे. उपकाराची भावना मैत्रीत असूच शकत नाही, पण तरीही एक मित्र जेव्हा आपल्याला thanks म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, की तू मला भरभरून आनंद दिलास, माझं आयुष्य अधिक सुखी आणि अनुभवसमृद्ध केलंस, तुझ्या सहवासात चार घटका राहून मी माझ्या चिंता विसरलो. आणि अश्या प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीला आवडत आहोत याची त्या एका thanks मुळे खात्री पटून आपणही सुखावतो, आणि मैत्रीचे नाते अधिक गहिरे होते.
आता मैत्री तुटण्याची किंवा दुरावा निर्माण होण्याची प्रमुख कारणे बघितली तर आपल्या असं लक्षात येतं, की गैरसमज हे सर्वात मोठं कारण आहे. एखाद्या मित्राला समजलं की आपण आपल्या मित्राचं मन दुखावलं आहे, पण मैत्रीत Sorry कसलं म्हणायचं, असं म्हणून तो गप्पं राहिला, तर ती जखम कुठेतरी मित्राच्या मनात घर करून राहणारच. त्या क्षणी त्यांची मैत्री टिकेल ही. पण असे अनेक घाव ते एकमेकांना देत गेले, तर आपण हळू हळू एकमेकांपासून दूर कधी गेलो हे त्यांना समजणार सुद्धा नाही. हेच जर आपली चूक लक्षात आल्या बरोबर लगेच मित्राला Sorry म्हटले, तर उलट मित्रालाच वाटेल कि अरे, एवढे Sorry म्हणण्या सारखे काय झाले? जाउदे की!
औपचारिक नात्यात आपण जेव्हा Sorry म्हणतो, तेव्हा ती क्षमा याचना असते, आणि मैत्रीत क्षमा याचनेला स्थान नक्कीच नसते. पण मित्र जेव्हा मित्राला Sorry म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, कि मी तुझं मन दुखावलं आहे, याची मला जाणीव आहे, आणि मलाच त्याचा इतका त्रास होतोय, की जणू काही तुला दुखावून मी माझं स्वतःचं मन दुखावलं आहे.
आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं, हे कोणत्याही नात्यात अतिशय गरजेचं असतं, कारण समोरच्या माणसाला आपलं मन जरी समजत असलं, तरी त्याला जे समजलंय ते बरोबर आहे ही खात्री त्याला केवळ आपणच देऊ शकतो. आणि ही खात्री देण्यासाठी sorry आणि  thanks खूपच उपयोगी पडतात.
मित्राने मित्राला Sorry किंवा Thanks म्हणणे, आणि मग मित्राने त्याला त्याबद्दल लटकेच रागावणे, यात जी गम्मत आहे, ती एकमेकांना कधीही sorry आणि  thanks न म्हणणाऱ्या मित्रांना कधी समजणारच नाही. कारण ते मित्र एकमेकांना गृहीत धरत असतात. आणि मैत्रीच नव्हे, कुठल्याही नात्यातील माणसे एकमेकांना गृहीत धरत असतील, तर त्यांचा एकमेकापासून दूर जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे हे नक्की समजावे.
तेव्हा कितीही जवळचं नातं असेल, तरीही sorry आणि  thanks ची साखरपेरणी अधून मधून करायला काहीच हरकत नाही. फक्त त्याचा औपचारिक अर्थ न घेता मैत्रीतला वेगळा अर्थ ध्यानात घेतला म्हणजे झाले! मग आपण आपल्या मित्राला गृहीत धरणार नसलो, तरी त्याच्या प्रेमाला नक्कीच गृहीत धरून चालू शकतो!


The law of violence?

The law of violence?


एकूण लोकसंख्येच्या अति अति नगण्य प्रमाणात अशी काही माणसे असतात, की जी पूर्णपणे थंड डोक्याने,ठरवून मनुष्यहत्या करू शकतात.एकतर पूर्णपणे उलट्या काळजाची, विकृत गुन्हेगार माणसे हे करू शकतात, किंवा मग, यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली, आणि आपण जे करीत आहोत ते देशाच्या, समाजाच्या हिताचे आहे याची संपूर्ण खात्री असलेली....पोलीस किंवा सैनिक अशांसारखी माणसे. फ़ार फ़ार कमी लोक असे असतात, की जे, दंगलीसारख्या एखाद्या अत्यंत प्रक्षुब्ध, ज्वालाग्राही भावनेने भारलेल्या कालखंडात मनुष्यहत्त्येचं पातक करू शकतात....पण अशा लोकांना त्या कृत्याची टोचणी अगदी अखेरपर्यंत सोबत करते.
बोकड, कोंबडी इत्यादी प्राण्यांना मांसासाठी मारायचे असेल, तर केवळ मांसाहारी आहे म्हणून वाट्टेल तो माणूस हे काम करू शकणार नाही. त्यासाठी व्यावसायिक खाटिक असणे गरजेचे आहे. मोठ्या वन्य प्राण्याची शिकार करायची असेल तर अगदी व्यावसायिक खाटिक नाही, पण तरीही बरंच धाडस अंगी असावं लागतं, आणी दगडी काळीज सुद्धा. पण त्या मानाने पक्ष्यांची शिकार करणारे संख्येने जास्त आहेत. पाण्यातील मासे पकडणे हा कोळी लोकांचा व्यवसायही आहे, आणि कित्येक लोकांचा छन्दही.
घरातील उंदीर मारणे, हेसुद्धा अगदी प्रत्येकाला जमणारे काम नव्हे, त्यासाठी थोडातरी धीटपणा हवाच. पाल मारणे हे त्या मानाने सोपे, पण तरीही बहुतेकांना नकोसेच वाटणारे काम.
अती हळव्या (आणि त्यामुळे चेष्टेचा विषय बनलेल्या) माणसांचं एक सोडलं, तर बाकी बहुतेक सर्वजण, डास,मुंग्या,झुरळे इत्यादीना अगदी सहज चिरडू शकतात.
आणि मातीत उगवलेलं एखादं गवताचं पातं, एखादे शेंबडे पोर देखील सहज उपटून फेकून देते.
एखादा जीव स्वतःपेक्षा जेवढा वेगळा, तेवढा तो हिंसक रीतीने नष्ट करणं माणसाला सोपं जातं, असा काही निसर्गनियम आहे काय???


Friday, September 7, 2012


                     कॉलेजची पोरं,विद्यार्थी नव्हे....गुरुच!!!

कॉलेजातून बाहेर पडलेल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, म्हणजे अगदी नुकत्याच passout होवून नोकरीला लागलेल्या माणसापासून ते अगदी senior citizen पर्यंत, की बुवा, कॉलेजातील मुला-मुलींकडे पाहून काय वाटतं हो तुम्हाला?म्हणजे अनेकांना तश्या अनेक गोष्टी वाटत असतील....पण अगदी प्रत्येकाच्या अगदी चट्कन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे.....ही मुलं कशी सतत हसत खिदळत असतात ना, आपल्यापेक्षा कितितरी पटीने आनंदी असतात कायम!
कुणितरी खडूस असं म्हणेल की त्यांच्यावर काय कसलीच जबाबदारी नसते, मग दात काढायला जातंय काय त्यांच्या बापाचं? पण जबाबदारी नसणे एवढंच त्यांच्या आनंदी असण्याचं कारण आहे असं नाही वाटत  मला.आपल्यापेक्षा वेगळं असं ते काय जगतात, किंवा हवं तर असं म्हणूया की कॉलेजात असताना आपण अत्तापेक्षा काय वेगळं जगत होतो, याचा बारीक विचार केला तर काही गोष्टी निश्चितच लक्षात येतात.
कॉलेजातील मुले-मुली खूप खूप active असतात.
खरंच किती नाचत असतात ही मुलं सारखी! गप्पांच्या ओघात मैलभर चालत काय सुटतात. कॉलेजात जिन्यावरून सतत वर खाली करतात. कॉलेजचं काम, प्रोजेक्ट पूर्ण करणं,फ़ेस्टिवल आयोजित करणं किंवा त्यात भाग घेणं. शिवाय त्यांच्या मजेच्या कल्पनाही फ़ार active असतात. pub मध्ये dance करणं, खेळ खेळणं, fashion म्हणून का होईना पण जिम ला जाणं. आणि व्यायामाचा कंटाळा असणाऱ्या आम्हा प्रौढांना विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या activities, बहुतांश वेळा तरी व्यायाम म्हणून केल्या जात नाहीत, तर त्या आपोआप होतात किंवा गम्मत म्हणून केल्या जातात.
आपल्यालाही आपल्या जीवनात अश्या activities बसवता आल्या, तर कंटाळत कंटाळत वेगळा व्यायाम नको करायला!
कॉलेजातील मुले-मुली मित्रांच्या सतत संपर्कात असतात.
कॉलेजातील मुले-मुली, ज्यांना यापुढे आपण कॉ.मु. म्हणूया, अतिशय सामाजिक आयुष्य जगत असतात. हे कॉमु कसे सतत एकमेकांबरोबर असतात. म्हणजे फक्त मजा करण्यापुरते नाहीत,तर अभ्यास, प्रोजेक्ट इत्यादी सुद्धा एकत्र करतात. ग्रुप मध्ये राहून केल्यामुळे अभ्यासासारख्या कंटाळवाण्या गोष्टी तेवढ्या बोअर राहात नाहीत :). Project submissions, वगैरेंचं tension कुठल्या कुठे पळून जातं. आणि याव्यतिरिक्त उरलेला वेळ तर काय, कट्ट्यावर गप्पांचा अड्डा टाक, जरा सुट्टी मिळाली की पिकनिक plan कर, घोळक्याने सिनेमाला जा....वाटल्याने आनंद वाढतो आणि दु:ख कमी होतं.” हा मंत्र शब्दश: जगत असतात. पुढे नोकरी वगैरे सुरू झाल्यावर असं सारखं सारखं मित्र मंडळीबरोबर वेळ घालवणं शक्य होत नाही हे अगदी खरं आहे. पण बहुतेक करून पुढाकार घेण्याचा आळस, जडत्व ही कारणं अधिक खरी असतात. कारण जुन्या मित्रांपैकी एखाद्याने पुढाकार घेण्याचा अवकाश, की त्याच्या हाकेला ओ द्यायची तयारी बऱ्याच जणांची असते हा अनुभव आपल्याला बरेचदा येतो, नाही का? गरज आहे थोडासा आळस झटकून तो फोन उचलण्याची, हल्ली तर नंबर पण लक्षात ठेवावे नाही लागत!!!

कॉमु स्वत:चे लाड करतात.
होय, खरंच आपण विसरून जातो स्वत:चे लाड करणं कॉलेजातून बाहेर पडल्यावर. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर थोड्याच दिवसात आपल्या लक्षात येतं की आता पोट सुटायला लागलंय आपलं. आणि पहिला घाला पडतो तो खाण्यापिण्यातल्या स्वच्छंदीपणावर.यात किती साखर असेल, त्यात किती calories असतील.....सगळी मजाच निघून जाते. या लेखातला जो पहिला मुद्दा, म्हणजे physical activities जीवनात जास्तीत जास्त अंतर्भूत करण्याचा आहे, तो आपण पाळला, तर खाण्यापिण्याचे लाड आपण सहज सुरु ठेवू शकू ;). म्हणजे एका teenager सारखं वाट्टेल तेवढं जंकफूड नाही पचवू शकणार आपण, परंतु अगदीच तिलांजली नाही द्यावी लागणार त्या बर्गर किंवा वडापावाला. खाण्यापिण्याव्यतिरिक्त, कॉमु स्वत:च्या दिसण्याकडे, कपड्यांकडेही किती लक्ष पुरवतात. पौगंडावस्थेतील हार्मोन्स चा परिणाम म्हणून जरा अतीच करतात हे मान्य आहे. पण आपलाही हा अनुभव आहेच की जेव्हा जेव्हा आपण आपल्या दिसण्याकडे नीट लक्ष देतो, तेव्हा तेव्हा आपला मूड खूप छान राहतो. मग कॉमुं इतकं अती नं करता, रोजच्या रोज खूप छान दिसण्याचा प्रयत्न करायला, मोजके का होईना, पण अगदी नियमितपणे नवे कपडे घ्यायला खरंच काय हरकत आहे? स्वत:चे लाड करण्याची कॉमुंची अजुन एक पद्धत म्हणजे, सतत संगीतात बुडून राहणे! आपल्या बिझी असण्यामुळे आपण मुद्दाम गाणी ऐकणं हे जवळजवळ विसरूनच गेलेलो आहोत. पण कॉमु पहा....सकाळी उठल्याबरोबर ब्रश करणंच मुळी सुरू होतं रेडीओच्या साथीने. कॉलेजला जाता जाता कानात earplugs असतातच. दोन कॉमु एकमेकांना भेटले की सर्वप्रथम, तुझ्या मोबाईल मध्ये कुठली गाणी? माझ्या ipod मध्ये कोणती गाणी? चल exchange करूया! हे सोपस्कार पार पडतात J. कुठे पिकनिक ला गेले की अंताक्षरी, गिटारवर गाणी म्हणणे......एकंदरीत एकदम संगीतमय जगत असतात पठ्ठे! संगीत ऐकता ऐकता कामे केली की मूड छान राहतो हे माहीत तर असतं आपल्याला, पण सतत संगीत कानावर पडत राहील अशी व्यवस्था करायला नाही बुवा जमत आपल्याला त्यांच्यासारखं! पण प्रयत्न करून पाहूया का? कॉमु असताना जे सहज जमत होतं ते आता जाणीवपूर्वक सुद्धा जमणार नाही? का बरं? हळूहळू जमेल नक्की.
कॉमु दर वर्षी एक एक इयत्ता पुढे पुढे जातात.
कॉमुंचं आयुष्य शैक्षणिक वर्षांमध्ये विभागलेलं असतं. प्रत्येक वर्षी ते एका इयत्तेतून पास होवून पुढील इयत्तेत जात असतात.(सन्माननीय अपवाद वगळून!) त्यामुळे वर्षभर मेहेनत करून काहीतरी achieve करून स्वत:ची प्रगती झाल्याचं समाधान आपसूकच त्यांच्या पदरी पडतं. तशी प्रौढांचीही प्रगती होतंच असते. प्रमोशन, लग्नं,मुलं होणं,मोठं घर किंवा गाडी घेणे इत्यादी. पण शैक्षणिक वर्षात होणाऱ्या प्रगतीचा सुनिश्चितपणा त्याला नसतो. बरेचदा ही प्रगती बाह्य गोष्टींवरही अवलंबून असते, अगदी देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते आपल्या बॉसच्या स्वभावापर्यंत! परंतु आपण आपल्यासमोर जर असं उद्दिष्ट ठेवलं की जे पूर्ण करणं सर्वस्वी आपल्याच हातात असेल, एखादा व्यवसाय सुरु करण्यापासून ते एखादं वाद्य शिकण्यापर्यंत काहीही, पण ते समोर ठेवून वर्षभर प्रयत्न करून ते साध्य केलं, तर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी परीक्षेत यशस्वी झाल्यावर जे सुनिश्चित समाधान कॉमुंना मिळतं, तसं आपल्यालाही मिळेल. ध्येय निश्चित करून ते साध्य केल्यामुळे स्वत:च्या जीवनावर स्वत:चं नियंत्रण असल्याची भावना निर्माण होते, जी सध्याच्या काळात फार दुर्मिळ झालेली आहे. कॉमुंना ती आपसूकच मिळते, आपल्याला प्रयत्नपूर्वक मिळवावी लागेल, एवढाच काय तो फरक!

कॉमु वर्षातून एकदा मोठ्ठी सुट्टी घेतात!!! J
शैक्षणिक वर्षानंतर साहजिकच आठवणारी गोष्ट म्हणजे उन्हाळी सुट्टी! कॉमुंना वर्षातून एकदा(तरी!) महिना दोन महिन्याची संपूर्ण सुट्टी मिळते. स्वत:ला पूर्णपणे recharge करण्यासाठी. प्रौढांपैकी किती जणांना मिळते बरं? बहुसंख्यांना तरी अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे आठवडाभर! पण या सुट्टीचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रौढांना अगदी कॉमुंसारखं महिनाभर शक्य नसलं, तरी जेवढी शक्य तेवढी, आणि मुख्य म्हणजे सलग सुट्टी, वर्षातून एकदातरी घ्यायला हवी. त्या मानसिक विश्रांतीनंतर आपल्या कामाचं नुकसान न होता प्रचंड फायदाच होतो. बऱ्याच यशस्वी उद्योजकांचा अनुभव आहे की मोठ्या सुट्टीनंतरच त्यांना व्यवसाय विषयक उत्तम कल्पना सुचल्या.
       तेव्हा प्रौढ मित्र-मैत्रिणिंनो, कॉमु हे स्वत: विद्यार्थी असले, तरी त्यांना गुरूच्या जागी ठेवून आपण बरंच काही, किंबहुना जीवन कसं जगावं हेच शिकू शकतो!
तेव्हा.......येत्या गुरुपौर्णिमेला तुमच्या ओळखीच्या एखाद्या कॉमुला एखादं छानसं गिफ्ट द्या, आणि त्याच्या चेहेऱ्यावर आधीपासून ओसंडून वाहणारया आनंदात थोडी भर घाला!!! J  


































Wednesday, May 16, 2012

ताटकळलेला बुद्ध.


                                  ताटकळलेला बुद्ध.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.
त्याच सुमारास तेथून भगवान बुद्ध चालले होते. त्यांची नजर त्या मनुष्यप्राण्यावर पडली. त्यांनी त्यास हलवून जागे केले आणि विचारले,” बाबा रे, तू असा रिकाम्या देव्हार्यासमोर ध्यानस्थ का बरं बसला आहेस?” चकित होवून मनुष्याने पाहिले तो खरंच देव्हारा रिकामा होता.
आपण ध्यानस्थ बसलो तेव्हापासून तो तसा होता की नंतर रिकामा झाला, हे त्याला काही केल्या आठवेना,उमगेना. पण गेली हजारो वर्षे, ज्या देव्हार्याची लोकसंख्या तेहेतीस कोटी आहे याची त्याला खात्री होती, ती प्रत्यक्षात शून्य दिसलेली त्यास सहन होईना. त्याच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागले, व तो बुद्धांना म्हणाला,”भगवान, आपण माझे डोळे उघडून मला सत्य परिस्थिती चे आकलन करून दिलेत हे उपकारच झाले माझ्यावर, पण हा देव्हारा रिकामा आहे असे सत्य स्वीकारण्याची मानसिक शक्ती माझ्या ठायी नाही. तेव्हा कृपया आपण अजून एक उपकार करा माझ्यावर. हा देव्हारा रिकामा असल्याचे आपण मला दाखवलेत, त्यामुळे त्याचे रिकामपण सहन करण्याची मनःशक्ती माझ्यात निर्माण होईपर्यंत तो रिकामा राहू न देण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते. तेव्हा जोपावेतो मी अशी दिव्य मानसिक शक्ती मिळवत नाही, तोपर्यंत आपणच या देव्हाऱ्यात बसा. कृपा करून नाही म्हणू नका, नाहीतर दु:खातिरेकाने माझा जीव......”
करुणा हाच स्थायीभाव असलेल्या बुद्धाला त्या मनुष्यप्राण्याची दया आली. त्याचे मन मोडवेना. तेव्हा तो तसे करायला कबूल झाला व देव्हाऱ्यात जावून बसला. शक्ती मिळवण्यासाठी मनुष्य परत एकदा.....आता भरलेल्या .........देव्हाऱ्यासमोर ध्यानस्थ बसला........
वर्षे गेली......शतके गेली.......युगे गेली.........रिकामा देव्हारा सहन करायची ताकद मनुष्यांत कधी येईल, वा तो कधी ध्यान सोडून डोळे उघडून आपल्याला कृतज्ञ निरोप देईल? याची वाट पाहत भगवान बुद्ध आजही त्या देव्हाऱ्यात ताटकळत बसलेले आहेत............

Saturday, January 14, 2012

त्रिवार अर्जुन!!!

महाभारत! भारतीय माणसाचा जीव की प्राण! यातील अनेक पात्रांना अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आदर्श मानत आलेली आहेत. पण त्यातल्या त्यात अर्जुन हा सर्वांना, विशेषतः तरुणांना नेहेमीच हवा हवासा वाटलेला आहे. लाडका असणं ठीक आहे, पण आजच्या तरुणासमोर तो आदर्श ठेवू शकेल? होय, अगदी नक्कीच ठेवू शकेल. सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात IT industry मध्ये काम करणारया तरुणांसमोर तर शब्दशः त्रिवार आदर्श ठेवू शकेल तो. त्याच्या जीवनातील ३ प्रसंगांमुळे.
सध्याच्या काळात सर्वच कार्यालयांमध्ये multi-tasking हा परवलीचा शब्द झालेला आहे. एकाच माणसावर अनेक कर्मचारयांच्या जबाबदारया टाकून पगाराचा पैसा वाचवण्याची कंपन्यांनी लढवलेली ही शक्कल आहे. आणि या युक्तीला भुलून ही तरूण मंडळी एकाच गोष्टीवर असाधारण एकाग्रता राखण्याच्या कौशल्याला कमी लेखू लागली आहेत.एका वेळी हजार गोष्टींच्या मागे लागून शेवटी कुठलीच नीटपणे पार पडत नाही व आपल्याला समाधान मिळत नाही हे ते विसरत चालले आहेत. शिवाय internet, t.v., वगैरे surfing करावयाच्या गोष्टी यात भर घालतातच. एखादी match, एक सीरियल, व एकदोन सिनेमे असं सगळं एकाच वेळी पाहिल्याशिवाय यांना मजाच येत नाही. हे पाहिल्यावर आठवतो तो विद्यार्थीदशेतला अर्जुन. "पोपटाशिवाय,... नव्हे, पोपटाच्या डोळ्याशिवाय,... मला दुसरे काहीच दिसत नाही". असे म्हणून आपल्या गुरुची वाहवा मिळवणारा अर्जुन. पण त्या वेळचे द्रोणाचार्य जर आजच्यासारखे कुठल्यातरी IIM-परशुराम आश्रम मधून MBA झालेले management guru असते, तर ते अर्जुनाला म्हणाले असते,"गधड्या, अरे बाकिचे शिष्य बघ कसे मस्तपैकी मल्टिटास्किंग करत आहेत! पोपट,झाडे, आजूबाजूचे शिष्य,मी,डोंगर, इत्यादी सगळं एकाच वेळी पाहत आहेत ते. असं पाहिजे, सगळीकडे एकाच वेळी लक्ष देता आलं पाहिजे! नुसत्या पोपटाच्या डोळ्याला काय चाटायचं आहे?"
होय तरुणांनो, मला माहित आहे की office मध्ये तुम्हाला या आधुनिक द्रोणाचार्यांचं म्हणणं मान्य करावंच लागेल. पण निदान office बाहेर, जीवनातील तत्व म्हणून तरी याला मान्यता देऊ नका. एखाद्या गोष्टीवर एकाग्र होवून त्यात निष्णात होणं, हा माणसाला महान बनवणारा गुण आहे. त्याचा त्याग करू नका. multitasking केल्यामुळे तुमचा तात्कालिक फ़ायदा होईलही पण जीवनात अत्त्युच्च पातळी गाठण्यासाठी, एकाच गोष्टीवर focus करणं, specialise करणं, हेच जास्तं महत्वाचं आहे, हे अर्जुनाकडून शिका.
IT-industry मध्ये काम करणारयांच्या आता एक गोष्ट चांगलीच अंगवळणी पडली आहे, ती म्हणजे अधून मधून project नसणे. म्हणजे त्यांच्या भाषेत बेंचवर असणे. एवढंच नव्हे तर हल्लीच्या मंदीच्या काळात तर नोकरी जाणे, बराच काळ unemployed असणे, हे सुद्धा बरयाच जणांना अनुभवायला मिळत आहे. हा अनुभव पांडवांना पण आला होता बरं का! कधी म्हणून विचारताय? त्यांचा १४ वर्षांचा वनवास हे एकप्रकारे बेकार असणे किंवा बेंचवर असणेच नव्हते का?१४ वर्षं बेंचवर, कल्पनाही नाही करवत ना?
युधिष्ठीर, नकुल, सहदेवांनी चकाट्या पिटतच घालवला हा काळ. भीमाने अनेक राक्षसांशी द्वंद्वयुद्ध खेळून आपली शक्ती शाबूत ठेवली व युद्धाची सवय ठेवली. पण खरया अर्थी या काळाचा सदुपयोग केला अर्जुनाने. शंकराच्या पाशुपतास्त्रापासून इंद्राच्या अमोघ शक्तीपर्यंत अनेक दिव्यास्त्रे प्राप्त करून घेण्यासाठी, थोडक्यात म्हणजे आजच्या भाषेत value addition साठी करून घेतला. योद्धा म्हणून अजिंक्य, अवध्य होण्यासाठी, best of the best होण्यासाठी केला. हा आदर्श ठेवून आजचा तरूण सुद्धा कठीण काळात निराश न होता नवनवीन technologies, softwares, शिकू शकतो, पुस्तके वाचून आपले द्न्यान वाढवू शकतो. किंवा अगदी नोकरी करताना वेळ न मिळाल्यामुळे राहिलेले काही छंदही पूर्ण करू शकतो. ज्याचा आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडण्यासाठी नक्कीच उपयोग होवू शकतो.
अश्या प्रकारे unemployed असलेला हा professional, मग जी पहिली नोकरी मिळेल ती पत्करतो. कधी ती कमी पगाराची असते, कधी त्यात job satisfaction नसते, कधी त्याच्या इभ्रतीला साजेशी नसते. अश्या वेळी आठवावा तो अद्न्यातवासातील अर्जुन! तुम्ही थोडी कमी दर्जाची नोकरी पत्करलीत तरी ती नोकरी करणारी व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व तुम्हाला बदलावं लागत नाही, व्यक्ती म्हणून तुम्ही तेच असता. भारतीय असणं, मराठी असणं, सुशिक्षित, सुसंस्क्रुत, मध्यमवर्गीय माणूस असणं सोडून द्यावं लागत नाही. पण अर्जुन? त्याला अद्न्यातवासात त्याचा क्षत्रियाचा, योद्ध्याचा मानाचा व्यवसाय त्यागावा लागलाच, पण राजपुत्र असणं, प्रतिष्ठित राजघराणे इत्यादी सगळं विसरून पायात चाळ बांधावे लागले. याहीपुढे जाऊन, अगदी सगळ्यात basic ओळख, "पुरुष असणे" याचाही त्याग करावा लागला. संपूर्ण पुरुष अशी ओळख असलेल्या त्या जीवाचं काय झालं असेल खरच त्या वेळी?
पण तरीही , वर्ष संपता संपता जेव्हा प्रसंग आला, तेव्हा हाती धनुष्य घेवून एकट्याने सर्व कौरवांचा पराभव केला. त्या एका वर्षात त्याच्या मनाचं खच्चीकरण का झालं नाही? कुठून आला हा आत्मविश्वास?
याचं कारण असं आहे की बाहेरून जरी नपुंसकाचं जिणं जगावं लागत असलं तरी आपण खरे कोण आहोत हे तो एक क्षणही विसरला नव्हता. शमी व्रुक्षावर लपवलेल्या शस्त्रांचा विसर त्याला तिळमात्रही पडला नव्हता.
असंच आता काहींच्या बाबतीत होत असेल, आधीच्या नोकरीत तुम्ही team leader असाल, पण आता तुम्हाला programmer ची नोकरी करावी लागत असेल. तरीही शमी व्रुक्षावर जपून ठेवलेल्या leadership qualities, ते द्न्यान, ती विद्वत्ता, ते शिक्षण यांचा क्षणभरही विसर पडू देवू नका. मग जेव्हा जेव्हा interview साठी जाल, तेव्हा team leader च्या आत्मविश्वासानेच जाल. व ते पद परत एकदा मिळवाल.
या तीन प्रसंगांव्यतिरिक्त अर्जुनाच्या संपूर्ण आयुष्यालाच व्यापून उरलेली गोष्ट म्हणजे, त्याची श्रीक्रुष्णावर असलेली अपार श्रद्धा. वरील सर्व प्रसंगातही ती लेशमात्रही कमी झाली नाही. त्याच्यासारखाच अढळ विश्वास परमेश्वरावर ठेवा, यश तुमचेच आहे. गीतेत म्हटलच आहे,
यत्र योगेश्वरः क्रुष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम.
आपले पूर्वज खरंच सांगत होते, महाभारत कधीच कालबाह्य होणार नाही. यात भर घालून मी म्हणेन, की अर्जुन कधीच म्हातारा होणार नाही!!!

कोंबडी आधी की अंडं?

मानवजातीला आजपर्यंत अनेक सनातन,कूट प्रश्न पडलेले आहेत, ज्यांची उत्तरं अजूनतरी मिळालेली नाहीत. पण त्या सर्व प्रश्नांचे विषयही तसेच तोलामोलाचे, भारी होते! पण अश्या एक नव्हे दोन सनातन प्रश्नांचा विषय झालेलं आहे ते साधसुधं,सरळ,सोप्पं "अंडं"! हे एक महदाश्चर्यच नाही का? ते प्रश्न म्हणजे "कोंबडी आधी की अंडं?" आणि "अंडं veg की non-veg?". हे प्रश्न विचारले जातात तेच अश्या अविर्भावात की त्यांचं उत्तर मिळणं हे विचारणारयालाही अपेक्षित नसतं.
पण एक दिवस मी असं ठरवलं की या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायचीच. या प्रश्नांची खरी उत्तरं एका अंड्याशिवाय कोण देऊ शकणार? त्यामुळे मी एका अंड्यालाच हे विचारायचं ठरवलं. मग मी एका बरयापैकी बुद्धिवान, (आणि रिकामटेकड्या) दिसणारया अंड्याला गाठलं, आणि त्याच्यापुढे पहिला प्रश्न टाकला."कोंबडी आधी की अंडं?" ते चमकलंच. "एवढे माणसासारखे माणूस असून एवढं माहीत नाही?"
सनातन प्रश्नाचं उत्तर मिळणार असल्यामुळे मी एका फ़डतूस अंड्याने केलेला अपमान गिळला मुकाट्याने.
अंडं ऐटीत बोलू लागलं "आपण जर कालचक्र उलटं फ़िरवत गेलो ना, तर आपण अश्या काळात जावून पोहोचू की जिथे कोंबडी हा प्राणी अस्तित्वात नव्हता. पण हो! त्य काळात अंडी अस्तित्वात होती!....अहो डायनोसोर ची! डायनोसोर अंडी घालत होते माहित आहे ना? अहो जगातील पहिली कोंबडी ही अंड्यातूनच जन्मली की, पण कोंबडीच्या नव्हे, कोंबडीच्या पूर्वजाच्या अंड्यातून. हां, आता तुम्ही कोंबडीचं अंडं अधी की कोंबडी आधी असं specifically विचारलंत, तर कोंबडी आधी, पण नुसतंच अंडं म्हणालात तर ते कोंबडीच्या आधीच जन्मले हो!"
मी अवाक. बुद्धीवान माणसाला ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही ते एका क्षुल्लक अंड्याने किती झटकन दिलं! मी उत्साहाने दुसरा प्रश्न विचारला "अंडे veg असते की non-veg?" यावर मात्र थोडा विचार करून ते अंडं म्हणालं की "ह प्रश्न जरा तात्विक वगैरे आहे, माझ्या ओळखीचं एक अंडं तत्व्द्न्यानाचं प्राध्यापक आहे, आपण त्यांनाच विचारू."
माझ्या मित्र अंड्याच्या ओळखीमुळे आम्हाला कशीबशी प्राध्यापक साहेबांची appointment मिळाली. माझा प्रश्न ऐकून, माझ्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकून प्राध्यापक महोदय बोलते झाले "या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी veg व non-veg या शब्दांची व्याख्या करायला हवी. शास्त्रीय द्रुष्ट्या, वनस्पतीपासून मिळालेले ते veg व प्राण्यांपासून मिळालेले ते non-veg अशी सोपी व्याख्या आहे. या व्याख्येप्रमाणे कोंबडीपासून मिळालेले अंडे हे non-vegच आहे. पण यात गोची अशी आहे, की दूध सुद्धा गायीपासूनच मिळते की महाराजा! मग दूध पण non-veg झाले की! उद्या एखादे कर्मठ सोवळे रावसाहेब तुम्हाला सांगू लागले की अंडे हे non-veg आहे, तर खुशाल हो म्हणा त्यांना, पण त्यांना सांगा की तुमच्या व्याख्येप्रमाणे सात्विक दूधही non-veg आहे, आणि मग त्यांचा चेहेरा पहा.
पण आपल्या भारत देशात veg व non-veg ची अजून एक व्याख्या केली जाते. ह्त्त्या करून मिळवलेले ते non-veg व हत्त्या न करता मिळालेले ते veg. या व्याख्येप्रमाणे आजकालची जीव नसलेली broiler अंडी तरी veg. ठरतील. पण साधारणपणे veg. समजली जाणारी अन्न, धान्य, भाज्या, थोडक्यात म्हणजे शेती करून मिळवलेली सर्व अन्न, non-veg ठरतील, कारण शेती मध्ये वनस्पती उपटून किंवा कापून, म्हणजे वनस्पती ची ह्त्त्या करून अन्न मिळवले जाते. मग veg. उरलं तरी काय? तर अंडं, दूध, आणि फ़ळे! म्हणजे मागील व्याख्येत non-veg ठरलेल्या २ पदार्थांनी या व्याख्येत veg. म्हणून हजेरी लावलेली आहे. आता अश्या परिस्थितीत आपण काय करू शकतो सांगा पाहू तुम्हीच..........."
".............ताव मारण्या व्यतिरिक्त काहीही नाही!" प्राध्यापक महाशयांचे प्रवचन ऐकून पोटात कावळे कोकलू लागले होते, त्यामुळे मी उद्गारलो. मग प्राध्यापकांच्या लक्षात आलं की एका भुकेलेल्या मनुष्यप्राण्यासमोर बसलेले आपण एक अंडे आहोत. स्वतःच्या धोक्याच्या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे त्यांना घाम फ़ुटला आणि त्यांनी मला जवळ जवळ हाकलून देत मुलाखत आटोपती घेतली.
दोन सनातन प्रश्नांची उत्तरे मिळाल्यामुळे मी नोबेल प्राईज वगैरे ची स्वप्ने पहात चाललो होतो, इतक्यात मला असं वाटलं की मागून कुणीतरी धापा टाकत येत आहे व मला हाक मारत आहे. मी पाहिले तर ते रिकामटेकडे अंडे व प्राध्यापक अंडे माझ्या मगून धावत आले होते, मी थांबल्यावर तेही थांबले व थोडा दम खावून मग बोलू लागले ," तुमचे सनातन प्रश्न काय झटक्यात सोडवले आम्ही, नाही का? पण एक मिनिट थांबा,......या प्रश्नांनी जगाच्या सुरुवातीपासून अक्षरशः असंख्य गप्पा, संवाद...वाद, यामध्ये मनोरंजनाचा मसाला पेरलेला आहे. तेव्हा आमची अशी विनंती आहे की दोन घटका करमणुकीसाठी वाद घालायला लोकांसाठी हे प्रश्न असेच अनुत्तरित सोडून देवूया....तेव्हा आम्ही दिलेली उत्तरे तुम्हे गुप्त ठेवलीत तर बरे होईल, कसे?"
अंड्यांमध्ये झालेल्या या माणुसकी च्या दर्शनाने मला गहिवर-बिहिवर आला हो अगदी. पण निःस्वार्थीपणा करायला मी काय अंडं आहे का? मी तद्दन माणूस असल्यामुळे मला प्रसिद्धीची हाव आहे, त्यामुळे मला काही हा लेख लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. तेव्हा या सनातन प्रश्नांची उत्तरे एकदम गुप्त ठेवण्याची जबाबदारी मी वाचकहो, तुमच्यावर टाकत आहे. धन्यवाद!!!

उपोद्‍घात व उपसंहार

काही शब्द आपल्याला त्यांच्या अर्थामुळे तर काही त्यांच्या नादामुळे आवडतात. नादमाधुर्यामुळे मला आवडणारे हे दोन शब्द, उपोदघात व उपसंहार.उपोदघात कादंबरीच्या आधी व उपसंहार कादंबरीच्या नंतर येत असल्यामुळे मला मतितार्थ माहित होता, पण नेमका शब्दश: अर्थ माहित नव्हता. पण काही गोष्टी कशा अकस्मातपणे उलगडत जातात!
एक दिवस माझ्या कानावर ’उदघाटन’ हा शब्द पडला आणि विचारांची एक मालिकाच सुरू झाली. ’उदघाटन’ या शब्दाचा मूळ धातू असणार ’उदघात’ म्हणजे नक्कीच ’सुरुवात’ असा असणार. आणि कादंबरीची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीचा भाग म्हणून ’उप+उद्‍घात= उपोद्‍घात’ असा उलगडा झाला. ’उपसंहार’ चा अर्थ उलगडणं त्या मानाने सोपं आहे. ’उप+संहार=उपसंहार= शेवटानंतरचा भाग’ किंवा उपशेवट!!! यामुळे एक गंमत अशी झाली की संहार चा शब्दशः अर्थ ठार मारणे असा समजला जातो, तसा नसून शेवट करणे असा आहे अशी ज्ञानात भर पडली.
या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द आहेत क्रमशः prologue व epilogue. त्यामुळे थोडा तर्क लढवून pro,epi,व logue या शब्दांचाही शब्दशः अर्थ समजला. logue म्हणजे नक्कीच लेखन, त्यामुळे log शब्द जोडलेल्या इतर शब्दांकडे गाडी वळली. logarithm=log+arithm= लिखित गणित. catalogue=cata+log=रकान्यात विभागलेले लेखन (categorised लेखन?) इत्यादी...
pro म्हणजे सुरुवात हे ओघाने आलंच.त्यामुळे proactive, promotion,procreate या शब्दांशी खेळत बसलो थोडा वेळ. पण ’लांबवणे’ याला ’prolong' का म्हणत असावेत इथे गाडी अडली आणी epi कडे मोर्चा वळवला.epi म्हणजे शेवट. लगेच आठवलं ते...epidemic! democracy शब्दामुळे demo/demi यांचा ’लोक’ या शब्दाशी संबंध आहे हा अंदाज होताच. म्हणजेच epidemic=epi+demic=लोकांचा शेवट करणारा!!! epidemic चा साथीचा रोग हा अर्थ माहीत होता, पण शब्दशः अर्थ किती भयंकर निघाला! मग epi राहिला बाजूला आणि demi शब्दानेच लक्ष वेधून घेतलं. वेतोबा, म्हसोबा इत्यादी देवांना demi-gods का म्हणतात ते समजलं. लोकदैवत!!! किती छान अर्थ!
शब्दांचे मूलशब्द आणि त्यांचे शब्दशः अर्थ शोधणं हे एक खूप मोठं शास्त्र आहे , आणि मी वर जे काही जावईशोध लावले आहेत त्यातील बरेचसे चुकिचेही असतील. पण वाचकांना शब्दार्थ सांगणे हा माझा हेतू नव्हताच मुळी! मनातल्या मनात मी जी काही कसरत केली, ज्या तार्किक कोलांट्याउड्या मारल्या, त्यातील मजा वाचकांपर्यंत पोचवणे एवढाच हेतू. ती मजा dictionary घेउन अर्थ शोधायला आली नसती.
असं वाटतं की माझ्या मनात ज्या शब्दांचे शब्दशः अर्थ उलगडत नाहियेत त्यांची एक मोठाली माळ होती, जणु काही फ़टाक्यांची माळ. ’उद्‍घाटन’ या शब्दाचे कानावर पडणे म्हणजे जणू काही ती वात पेटवली जाणे. आणि धडाधड फ़टाके फ़ुटत जावेत तसे एकेका शब्दाचे अर्थ उलगडत गेले. या माळेतील काही फ़टाके न फ़ुटलेले राहतात तसे episode,epilleptic,epicentre इत्यादी काही शब्द न उलगडता तसेच राहिले. भूकंपाला epicentre असतं, म्हणजे काय? ’शेवटचा केंद्रबिंदू’?
कुणास ठाऊक, या शब्दांचा अर्थ समजेल तेव्हा फ़टाक्यांच्या एका नव्या माळेचा ’उपोद्‍घात’ होइल कदाचित!!!